राजकारण

मुख्यमंत्र्यांसमोर काँग्रेसचा ‘ना’राजीनामा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांत वारंवार खटके उडत असल्याचे दिसत आहे. त्यात राज्यामध्ये कोरोनाची वाढती स्थिती आणि सरकारच्या विरोधात जाणारे काही मुद्दे ही कारणे आहेत. याशिवाय संजय राऊत यांच्यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरही काँग्रेस नाराज असल्याचे समोर येत असून काँग्रेसने ही नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ज्या समान किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्या समान किमान कार्यक्रमावर सरकार चाललं पाहिजे, असं काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसंच, काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी कमी मिळत असल्याची तक्रार देखील मुख्यमंत्र्यांकडे केली.

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी काँग्रेस नेत्यांकडे असलेल्या खात्यांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार केली. तसंच समान किमान कार्यक्रमाची आठवण देखील करुन दिली. यावर समन्वय समिती शिवाय वरिष्ठांची समिती होईल, जी समान किमान कार्यक्रमावर चर्चा करेल, असं एच. के. पाटील म्हणाले.

शरद पवार यांना युपीएने अध्यक्षपद सोपवावे, अशा प्रकारची विधाने संजय राऊत यांनी वारंवार केल्याचे दिसून येते. यावरूनच संजय राऊत यांच्या विरोधात काँग्रेसची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली असून महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी यासंदर्भातील नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर बोलूनही दाखवली असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या यूपीएच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. सानिया गांधी यांच्या यूपीए अध्यक्ष पदाबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर नेते नाराज आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत, असं एच. के. पाटील म्हणाले.

निधी वाटप, महामंडळ वाटपाविषयी चर्चा झाली. तसंच समान किमान कार्यक्रमानुसार सरकार चालवण्याविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊन नको हीच सरकारमधील सर्वांची भावना आहे, असं म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button