पुणे: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. तब्बल १९ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता लवकरच राजीव सातव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
राजीव सातव यांच्यावर २३ एप्रिलपासून पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते. गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद द्यायला लागले. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सामान्य स्थितीत आली होती.
४५ वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.