राजकारण

बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपही सामिल झाला आहे. त्यावरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे. मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजप मोर्चे काढत आहे. बघू आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत. ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चाचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

दरम्यान, कोल्हापुरात मराठा तरुणांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्या आंदोलनात भाजपचा झेंडा न घेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असं मी म्हणालो होतो. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. कोल्हापुरातील सर्व तालमी, सर्व संघटना आणि मंडळांनी पुढाकार घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या लाक्षणिक उपोषणाचं पुढे काय होतं हे माहीत नाही. या आंदोलनात भाजपचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून मी आलो आहे, असं पाटील म्हणाले.

रोज दळण दळत बसता. हे चालणार नाही

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा. पण या सरकारला ही याचिका दाखल करायची नाही. त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही. 102व्या घटनादुरुस्तीनुसार मागास आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला आहे. पण दीड वर्षात हा आयोग स्थापन केला नाही, अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याचं काम सरकार करत नाही. रोज दळण दळत बसता. हे चालणार नाही. सारथी संस्थेचा पत्ता नाही, अण्णासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता कशाचा कशाचा पत्ता नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button