नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली आहे. विशेष म्हणजे भाई जगताप यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणामुळे राहुल गांधी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे.
भाई जगताप यांनी या भेटीमध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. या भेटीत मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जगताप यांनी राहुल गांधी यांना येत्या २८ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या या निमंत्रणामुळ काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये आलेच तर ते कोणत्या विषयावर बोलणार याकडेदेखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांना मुंबईमध्ये आमंत्रित करण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यांपासूनच करण्यात आले होते. ६ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीतदेखील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी 28 डिसेंबर या काँग्रेसच्या स्थापना दिली मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा घेणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली होती.
दरम्यान, भाई जगताप यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबर रोजी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली होती. त्यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव आणि पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीचं गणित, निवडणुकीचा आराखडा समजावून सांगितला होतं. तसेच मुंबई जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे याच्या सूचनाही दिल्या होत्या. यावेळी त्यांनी आम्ही २२७ जागा लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.