नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली. लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्याच्या मागणीचं निवेदन काँग्रेस शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना दिलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती.
काँग्रेसकडून लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीचे पिता असल्यानं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ पदावरुन हटवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. राहुल गांधींसह प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलामनबी आझाद, ए.के.अँटनी या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी मिश्रा केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदी असल्यानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं अशक्य असल्याचं सांगत त्यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची पीडितांची मागणी राष्ट्रपतींसमोर मांडल्याचं प्रियंका गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
काँग्रेसचं पाच सदस्यीय शिष्टमंडळात राहुल गांधीं व्यतिरिक्त राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, वरिष्ठ नेते एक अँटनी, गुलाब नबी आझाद, लोकसभेमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी आशीष मिश्राच्या अटकेनंतर भारतीय शेतकरी युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राकेश टिकैत यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत अजय मिश्रा मंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत निष्पक्ष तपास होणं अशक्य आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिला नाही, तर आंदोलन करु, असा इशाराही दिला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे विशेष तपास पथक (एसआयटी) कसून चौकशी करत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आशिष मिश्राला पोलीस कोठडी देण्यात आली.