पुणे आग प्रकरणी कंपनीचा मालक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आग दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून आगीच्या दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केली आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत. पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत ३७ कर्मचारी होते अशी माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांपैकी १८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. पण काहींना मात्र या दुर्घटनेच आपले प्राण गमवावे लागले.
आग दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५०,००० रुपये भरपाई देण्यात येणार आहे.