Top Newsराजकारण

मोदींच्या सभांना गर्दी होत नसल्याने आयोगाने जाहीर प्रचारावर बंदी घातली असावी !

संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारासाठी नियमावली आखून दिली आहे. देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या सभांना गर्दी होत नाही, म्हणून निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला असावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या सभांना गर्दी जमत नसल्यामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ३१ जानेवारीपर्यंत प्रचारसभा आणि रोड शो वर बंदी घातली असावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत मीडियाशी बोलत होते.

गोव्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळणार नाही. गोव्यात मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या दोन नेत्यांनी भाजप पक्ष रुजवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, आता मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल भाजपमधून बाहेर पडला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अशा परिस्थितीत भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही, हे मी लिहून देतो, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. आणखी तीन वर्षे हे सरकार टिकेल. त्यामुळे भाजप नेत्यांकडे वेळ घालवायला काहीच साधन नाही. त्यामुळे ते पालिका आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या खेळामध्ये त्यांनी आता राजभवनालाही सामील करुन घेतले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे मोठे संख्याबळ आहे. या संख्याबळाचा वापर करुन त्यांनी लोकशाहीच्यादृष्टीने विधायक कामे करता येतील. पण ते तसे करत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button