नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे या…; नितीन सरदेसाई यांचे मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमार बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय. माहीमसह मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये शंभराहून अधिक बोटी उध्वस्त झाल्यामुळे त्यांच्यासमोर पोटा – पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने यात लक्ष घालून संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजी आ. नितीन सरदेसाई यांनी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात त्यांनी सांगितले की, ‘तौक्ते’ चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या किनारपट्टी नजीकच्या भूभागावर थैमान घातलं. आधीच कोरोनाचे संकट त्यात हे वादळ. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तसेच झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. माणूस गाडीत असताना गाडीवर झाड कोसळल्याच्या घटना माझ्यासमोर घडल्या आहेत. प्रशासन, फायर ब्रिगेड, पोलीस या सर्व यंत्रणा या संकटाचा सामना करत आहेत. पण संकटाची व्याप्तीच एवढी आहे की त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. म्हणूनच माझी सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की आपण जिथे असाल तिथे नागरिकांना व यंत्रणांना जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहनही सरदेसाई यांनी केले आहे.