समोर या, औकात दाखवू : निलेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा

मुंबई : आम्हाला काडीभर फरक पडत नाही, समोर येऊन दोन हात करा, असे आव्हान भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसैनिकांना दिले आहे. कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ, असे ट्विट त्यांनी केले आहे.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
औरंगाबादेतही गुन्हा दाखल होणार
नारायण राणे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक, नारायण राणे यांच्या विरोधात औरंगाबादेतही गुन्हा दाखल होणार, शिवसेना आमदार अंबादास दानवे राणेंविरोधात तक्रार देणार, क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करणार, गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी अंबादास दानवे ठिय्या आंदोलन करणार
भाजपची रणनीती लोकांना समजते : पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपची रणनीती लोकांना समजते आहे. भाजप काहीही करु शकते. एकीकडे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात मारण्याची भाषा करतात. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दहीहंडी सण साजरा करणार असं सांगतात.
पंतप्रधान मोदींनी राणेंचा राजीनामा घ्यावा : सुधाकर बडगुजर
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत. अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणी नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केली.
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगले काम करण्याची आणि राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळाली होती. परंतु, नारायण राणे यांनी ती संधी वाया घालवली. केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. नारायण राणे यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले.