मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याच चिपी विमानळाचं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घघाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार येत्या ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्याच दिवशी १२.३० वाजता या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.
राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर
कार्यक्रम पत्रिकेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे. तर राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात प्रोटोकॉलनुसार हा क्रम देण्यात आला आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचं मानलं जात आहे.