सीआयडी करणार परमबीर सिंग खंडणी प्रकरणाचा तपास

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जुलै महिन्यात कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्तांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) सोपवला आहे. त्यामुळे टीम परमबीर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात परमबीर सिंग यांच्याव्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांचीही नावे सहआरोपी म्हणून आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपी असल्याने तपासाची व्याप्ती मोठी होती. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरू होता.
संजय पुनमिया आणि सुनील जैन हे दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळावी म्हणून पोलीस आयुक्तांनी तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्याचे दस्तावेज सीआयडी लवकरच कोपरी पोलिसांकडून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.