मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी सुरूवातीला ७ जानेवारी २०२२ पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम १४४ चा कालावधी पोलिसांनी १५ जानेवारीपर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, ३१ डिसेंबरच्या अनुशंगाने नागरिकांनी पॅनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुषंगाने सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलीस पथके, पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घरी राहून यंदाचा ३१ डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.