मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी ७.३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत तोडगा निघणार का नाही? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
मागील नऊ महिन्यांहून अधिक काळापासून १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा पेच प्रलंबित असून नोव्हेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळाकडून १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली होती. मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघाला नाही आहे. यादरम्यान राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांबाबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावरून राज्यातील विविध भागात १२ सदस्य नियुक्त प्रलंबित राहिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरावरून टीका केली. मात्र आज थोड्याच वेळात मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेतली आणि यावर निर्णय आज घेतला जाईल अशी आशा आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त असून अद्याप यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. जवळपास ८ महिने उलटूनही १२ जणांच्या नावावर अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. राज्यपाल नियुक्त जागा लवकर घोषित व्हाव्यात यासाठी मविआ नेत्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. परंतु हायकोर्टानं अपेक्षित निर्णय न दिल्यानं अद्यापही ही यादी रखडली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावाची यादी दिली होती. या यादीतील काही नावावर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकरण सोडवण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. या भेटीत १२ जणांच्या नावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
आक्षेप असणारी नावं वगळण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असं सांगितले, तर महाविकास आघाडी त्यांनी दिलेल्या यादीवर ठाम राहील का? कारण राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीच्या यादीवर ठाम राहिले तर आणखी काही काळ ही नावं घोषित होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र विधान परिषदेत आपापलं संख्याबळ वाढवण्यावर तिन्ही पक्षांनी भर देत काहीतरी तडजोडीची भूमिका घेतली तर लवकरच ही यादी घोषित केली जाईल.
सचिन सावंत (काँग्रेस), एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस), यशपाल भिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस), नितीन बानुगडे-पाटील (शिवसेना) या ४ नावांना आक्षेप असल्याची चर्चा आहे.