ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांकडून दिशाभूल : भुजबळ

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही. फडणवीस हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या विषयावर आम्हाला राजकारण करायचं नसल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतील आरक्षणाबाबत बैठक झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून फडणवीस भुलभुलैय्या करत आहेत. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, असं भुजबळ म्हणाले.
कोर्टाकडून ओबीसींच्या लोकसंख्येची विचारणा केली जात होती. त्यामुळे जनगणनेचे आकडे केंद्राकडे आहेत. आमच्याकडे नाहीत. तुम्ही केंद्राला आदेश दिले तर आम्ही तुम्हाला हे आकडे देऊ शकतो, असं आम्ही कोर्टाला सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
पदोनन्तीतील आरक्षणाबाबतची चर्चा अजून संपलेली नाही. ही चर्चा सकारात्मक झाली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच आजच्या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा झाली, असं ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाधिवक्ता आज रात्री या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.




