छत्तीसगडमधील अधिकाऱ्याचा नागपूरमध्ये संशयास्पद मृत्यू
नागपूर : छत्तीसगडमधील बेपत्ता अधिकाऱ्याचा मृतदेह नागपूरमधील लॉजवर संशयास्पद अवस्थेत आढळला. कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले राजेश श्रीवास्तव 1 मार्चपासून बेपत्ता होते. नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्यामुळे छत्तीसगढमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव एक मार्चपासून मंत्रालयातून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. राजेश श्रीवास्तव यांच्याशी 1 मार्चपासून संपर्क होऊ शकत नव्हता. नागूपरमधील सीताबर्डी भागातील लॉजमध्ये 104 क्रमांकाच्या खोलीत ते राहत होते. त्यांनी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ते बेडवर मृतावस्थेत आढळले. लॉज मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
ओळख पटवण्यासाठी त्यांचा मोबाईल आणि लॉजमधील नोंदीचा पोलिसांनी आधार घेतला. श्रीवास्तव यांच्या गळ्यात सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल आणि तीन हजार रुपये आढळले. रायपूरहून नागपूरला मार्केटिंगच्या कामासाठी आल्याची नोंद त्यांनी लॉजच्या रजिस्टरमध्ये केली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
राजेश श्रीवास्तव दीर्घ काळ विलासपूरमध्ये सहसंचालकपदी कार्यरत होते. 2019 मध्ये त्यांना अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ बिलासपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचा आदेश देण्यात आला. श्रीवास्तव यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रतिनियुक्तीवर पाठवण्यापूर्वी आपली संमती घेतली नसल्याचं त्यांनी याचिकेत सांगितलं होतं. हायकोर्टाने त्यावर स्थगिती दिली. जून 2020 मध्ये विभागाने श्रीवास्तव यांची निधी, लेखा आणि निवृत्तीवेतन संचालनालयात बदली केली.