
पणजी : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वयंपूर्ण गोव्यासाठी लोक भाजपला निवडून देतील याची मला खात्री आहे. देवेंद्र फडणवीस पक्षाकडून गोव्याचे प्रभारी आहेत. त्यांचा अनुभव हा गोव्यातील लोकांना फायदेशीर ठरेल. संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हटले आहे.
गोवा विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आलीय. गोव्यातील निवडणुकीवर तृणमूल काँग्रेस, आपनं लक्ष केंद्रीत केलंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे संकेत डोळ्याने गोव्याची निवडणूक देखील यावेळी हाय व्होल्टेज ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात यावेळी भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे. २०२२ मघ्ये २२ प्लसचा नारा असून स्वयंपूर्ण गोव्यासाठी मतदार भाजपलाच मतदान करतील, असं सांगितले. गोव्यात अस्तित्वच नसलेले पक्ष (तृणमूल काँग्रेस, आप) प्रयोग करण्यासाठी आले आहेत. बाहेरून आलेल्या पक्षांनी एकदा गेल्या निवडणूका आठवून पाहाव्यात, असं सावंत म्हणाले.
अन्य राजकीय पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा काळ आता संपला. कोरोना काळात प्रकल्पांची उदघाटने राहिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका आता जाहीर होणे अपेक्षित असताना ही उदघाटने होत आहेत. ‘गोवा प्रगती’ कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या विभागाने केलेली कामे आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहोत. इथे डबल इंजिन सरकार आहे. केंद्रात मोदींजींचे सरकार आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
आत्मनिर्भर भारत स्वयं पूर्ण गोवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला तो परत एकदा लोकांकडे घेऊन जाणार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या ६० वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे. तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आमचे रिपोर्ट कार्ड तयार आहे. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत, असं प्रमोद सावंत म्हणाले.
गोवेकरांचा नरेंद्र मोदींवर विश्वास
शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांचे मुळात गोव्यात अस्तित्व नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किती चालेल? कशापद्धतीने चालेल? हा मुद्दा आहे. कोण कुणाला ऑक्सिजन पुरवतो आहे ते मला माहित नाही. पूर्ण गोवेकरांचा माझ्यावर, भाजप आणि मोदींजींवर विश्वास आहे. आम्ही केलेली कामे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत. त्यांच्या उद्देश आहे भाजपला हरवणे. आमचा उद्देश आहे जनतेच्या सेवेसाठी परत एकदा सत्तेत येणं… स्वयंपूर्ण गोव्यासाठी आम्ही लोकांना साद दिलीय, तुम्ही आम्हाला सेवेसाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.
भाजपचे दिगग्ज राष्ट्रीय नेते गोव्यात येऊन गेले आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांचे (ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल) नेत्यांपैकी कोण येतोय, किती दिवस राहतोय याची मला चिंता नाही. आमचे नेते गोव्याला काही प्रकल्प देऊन जातात म्हणून ते आठवणीत राहतात. मोदींनी गोव्याच्या विकासासाठी गेल्या ८ वर्षात २२ हजार कोटी दिले ते कायम लोकांच्या लक्षात राहील, असं सावंत यांनी सांगितलं. बाकी अन्य कुणी इथे येऊन प्रयोग करायचा प्रयत्न करीत असेल तर आमची जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय हे त्यांना समजते.




