
फलटण : ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करु नयेत अशी खोचक टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलय. संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जाना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मारलाय. फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली.
संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.
सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साता-यातील फलटण येथील कार्यक्रमात केली आहे. संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनचं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.