
उधोजीराजेंनी आज आपल्या निकटच्या सहकाऱ्यांची तातडीची व्ही.सी. ठेवलेली आहे. आपल्या साहेबांना घाई तर कसल्याच गोष्टींची नसते. त्यांचं कसं सगळं हळूहळू हळूहळू असतं. कोणीतरी त्यांना चांगली पंचवीस वर्षे सडवत राहिलं आणि हळूहळू हळूहळू करत त्यांच्या लक्षात आलं की आपली पंचवीस वर्षे सडवलीत यांनी; मग तावातावाने साहेबांनी जाहीर सभेत युतीचा कटोरा साभिनय भिरकावला. तोही परत कधी हातात न घेण्यासाठी ! सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे तो इतका हळूहळू हळूहळू भिरकावला गेला की , तो सभामंडपाच्या बाहेर जाण्याआधीच परत हातात आला ! सकाळी घरातून बाहेर पडण्यासाठीची तयारीसुद्धा साहेब इतकी हळूहळू हळूहळू करतात की, तयारी होइपर्यंत रात्र झालेली असते आणि मग ते घरातून बाहेर जाणंच रद्द करून टाकतात .असं असतांना या तातडीने ठेवण्यात आलेल्या व्ही.सी.मुळे सगळेच निमंत्रित गोंधळात पडले. सोबतचा निरोप तर अजूनही जास्त गोंधळात टाकणारा होता. व्ही. सी. सुरू असतांना सर्वांनी वातावरण निर्मितीसाठी पार्श्वभूमीवर अभिताभच्या जुन्या ‘ नसीब’ चित्रपटातलं ‘ चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हु.’ हे गाणं सुरू ठेवायचं होतं. सगळेच जर गोंधळलेले असले तर व्ही.सी.मध्ये चर्चा कसली आणि कशी करणार, निर्णय तरी कसला आणि कसा घेणार, या विचाराने अवस्थ झालेल्या एका निकट सहकाऱ्याने स्वतःला थोडंस सावरलं आणि निर्णय तर आपल्याकडून एकही धड झालेला नाही, त्याच्यामुळे काही बिघडतही नाही,पण चर्चा तर व्यवस्थित व्हायला हवी या उदात्त हेतूने त्याने थेट उधोजीराजेंनाच फोन लावला
नि. स. – हॅलो सायेब, जय महाराष्ट्र.
उधोजीराजे – जय महाराष्ट्र. बोला. आता थोड्याच वेळात आपली व्ही.सी. सुरू होणार आहे , तरी कसा फोन केलात ?
नि.स. – त्येचं असं आहे सायेब , त्ये व्ही.सी. सुरू असतांना प्रत्येकाने पाटीमागं त्ये, ‘चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हु’ गाणं का म्हणून वाजवायचं त्ये काय ध्यानात येऊन नाही रायलं. म्हणलं डायरेक सायबांशीच बोलावं, नायतर वायची एन टायमाला गडबड .
उधोजीराजे – हं , ते गाणं कुठल्या पिक्चरचं आहे, माहीत आहे का तुम्हाला ?
नि.स. – अरे व्वा , कसं माईत नसल ? ‘ नसीब’. चारदा पायेल हाय ,एक रुपया पाच पैशाच्या टिकटावर . त्यो बच्चन होता ना त्येच्या मंदी.
उधोजीराजे – बरोबर ! मग आता मला सांगा की , आपल्याला सत्ता काय जनतेने दिली का ?
नि.स. (ओशाळत) – नाही, आपण ढापली ती.
उधोजीराजे ( ओरडत) – असं वाट्टेल ते काय बरळता ? तुम्ही का विरोधीपक्ष नेते आहात का ? नशिबाने मिळाली ती आपल्याला. समजलं ?
नि.स. ( अत्यंत खालच्या आवाजात ) हो सायेब.
उधोजीराजे ( समजावणीच्या सुरात ) – आता सत्ता मिळाल्यापासून आपण काय करतोय ? रेमडेसीविरसाठी हात जोडतोय . लसीसाठी पाया पडतोय. जीएसटीच्या पैशांसाठी हात जोडतोय. मधूनच आपले प्रवक्ते राजभावनावर जाऊन कुर्निसात घालतात , वर बावळटासारखे तो फोटो आपल्याच वर्तमानपत्रात छापतात. आता परत त्या मराठा आरक्षणासाठी केंद्राला जाहीरपणे हात जोडावे लागत आहेत. मग पार्श्वभूमीवर ‘ चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हु. ‘ नाही वाजवायचं तर काय , ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगा ‘ वाजवायचं’ ?आता तर मी असं ठरवलं आहे की, पुढच्यावेळी जेव्हा विधानसभा लागेल तेव्हा आपण आघाडीसाठी ‘ नमस्कारासाठी जोडलेले हात’ किंवा ‘ पाया पडण्यासाठी वाकलेला माणूस ‘ असंच निवडणूक चिन्ह मागून घ्यावं ! लोकांना वाटेल की, आपल्याला हात जोडले, आपल्या पाया पडले . केंद्राला वाटेल की, आपल्याला हात जोडले , आपल्याच पाया पडले ! कसं वाटतं ?
नि.स. ( आत्मविश्वासाने) – पन आपलं सरकार तर पंचवीस वर्स चालणार आहे असं सांगत्यात . मंग येवडी घाई कशापायी करायची ?
उधोजीराजे ( वैतागून ) – मूर्ख आहे तो सांगणारा ! अरे एका वर्षात तिनशे पासष्ट दिवस असतात, तास नाही !
(संपर्क ७८७५०७७७२८)




