केंद्र सरकार ४.५ लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स आयात करणार
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात औषधांचा मोठा तुटवडा भासतो आहे. उपचाराअभावी रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स आयात करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार अमेरिका आणि इजिप्त देशाकडून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मागवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाने एकूण ४.५ लाख रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स मागवले आहेत.
भारत सरकारने अमेरिका आणि इजिप्तमधील मिस्त्र येथील दोन औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून तब्बल ४.५ लाख रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स मागवले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात शुक्रवारी एकूण ७५ हजार रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स उपलब्ध होतील. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सध्याची औषधांची कमतरता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेच्या कंपनीकडून २ दिवसांत १ लाख इंजेक्शन
सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या मालकीची असलेली सरकारी कंपनी एचएलएल लाईफकेअर लिमिटेड ने ४.५ लाख रेमडेसिव्हीरच्या डोससाठी अमेरिका आणि ईजप्तमधील कंपन्यांशी चर्चा केली आहे. यामध्ये अमेरिकेची मेसर्स गिलिएड साईसिज इंक ही कंपनी पुढच्या एक किंवा दोन दिवसांत ७५ हजार ते १ लाख रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स देणार आहे. त्यांतर १५ मे पर्यंत आणखी १ लाख नवे इंजेक्शन्स या कंपनीकडून मिळतील.
इजिप्तच्या कंपनीकडून सध्या १० हजार इंजेक्शन
इजिप्तच्या मिस्त्र येथील ईवा फार्मा कंपनी सुरुवातीला १०,००० रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स पाठवेल. त्यानंतर प्रत्येक १५ दिवसांनी आणखी ५० हजार नवे रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स ही कंपनी देईल.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खरेदीबाबत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी भारत देश मिस्र येथून तब्बल ४,००,००० रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन्स खरेदी करण्याचा विचार करणार आहे असं गुरुवारी संगितलं होतं. तसेच संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश आणि उझबेकिस्तान येथूनसुद्धा इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, असंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं.
देशाला दररोज २ ते ३ लाख इंजेक्शनची गरज
दरम्यान, देशात सध्या प्रतिदिन ६७,००० रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचं उत्पादन होत आहे. मात्र, देशाला सध्या प्रतिदिन २-३ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. त्यामुळे सरकार रेमडेसिव्हीरचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच खबरदारी म्हणून सरकारने रेमडेसिव्हीर तसेच इतर पुरक साधनांच्या निर्यातीवरसुद्धा बंदी घातलेली आहे.