
अमरावती: काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यातील काही भागात १२ तारखेला हिंसाचार भडकला आणि त्याची रिअॅक्शन १३ तारखेला उमटली. पण १२ तारखेच्या घटनेबाबत कुणीच बोलत नाही, फक्त १३ तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जातोय. १२ तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? त्या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारले.
तु पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, पण १२ तारखेची घटना डिलीट करुन १३ तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई १३ च्या घटनेवर सुरू आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीच बोलत नाहीत. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही, पण चुकीच्या घटनेवर भर दिला जातोय. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न नाही ना? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
फडणवीस पुढे म्हणाले, चुकीच्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. कुराण शरीफ जाळण्यात येत असल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला, पण तो व्हिडीओ दिल्लीच्या कॅम्पमधील होता. त्याचवेळी पाकिस्तानातील फोटो व्हायरल झाला. मोठ्या हिंसाचारासाठी समाजाला भडकवण्यता आलं. एकाच वेळी विविध शहरातून एवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.
रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते?
रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे, रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले, याची प्रथम चौकशी व्हायला हवी. या पाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का, या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते, मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती, तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे, हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटते ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. रझा अकादमीवर बंदी घालायची हिंमत आहे का, अशी विचारणा फडणवीस यांनी केली.




