अर्थ-उद्योग

राज्यातील ७ लाख १५ हजार परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान मिळणार

मुंबई : राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पध्दतीने जमा करण्यात येईल.

रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. ती झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ठरवण्यात आलेली रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येईल, असे अनिल परब यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

परिवहन विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी रिक्षा परवाना धारकाला आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर लाभधारकांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध घटकांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांसाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button