इतर

लोटे औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट; ३ ठार, तर ६ जण जखमी

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यात आज येथील समर्थ केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीररित्या भाजले आहेत.

लोटे औद्योगिक वसाहतीत आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यातील सहा जणांपैकी तिघांना मिरज येथील रुग्णालयात दाखल केले आहेत, तर तिघे जण परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन महिन्यातील आगाची ही पाचवी घटना आहे. यापूर्वी झालेल्या स्फोटातही अनेक कामगारांना आपला जीव गमावावा लागला आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोळ पसरल्याने अनेकांनी घटनास्थळाहून पळ काढला. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अश्निशमन दल आणि स्थानिक पोलिस यंत्रणेने धाव घेतली आहे. या अश्निशमन यंत्रणेकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेनंतर आता लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी येथील घरडा केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button