मायावतींचे जातीय राजकारण; अयोध्येत आजपासून बसपाचे ब्राह्मण संमेलन

लखनौ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतींनी राजकीय खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेशात जातीय समिकरण साधण्यासाठी आजपासून बसपा संपूर्ण राज्यात ब्राह्मण सम्मेलनाचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे रामाची नगरी असलेल्या अयोध्येतून ब्राह्मण सम्मेलनांची सुरुवात होत आहे. बसपा सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अयोध्येनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अशा प्रकारच्या सम्मेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये दुपारी १ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील. मायावतींनी २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीत दलित आणि ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत.
बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांवर आणि रॅलींवर बंदी घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ११ जुलै २०१३ रोजी मोती लाल यादव यांनी दाखल केलेल्या पीआयएल क्रमांक ५८८९ वर सुनावणी करताना उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांची जातीय आधारावरील सम्मेलने, रॅली आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली होती. जस्टिस उमानाथ सिंह आणि जस्टिस महेंद्र दयाल यांच्या डिव्हिजन बेंचने निर्णय देताना म्हटले होते, की राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांमुळे समाजात मतभेद वाढतात आणि निष्पक्ष निवडणुकीलाही अडथळा निर्माण होतो.