
लंडन : लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकांनंतर तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला ९५ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना भारताने २७८ धावांची मजल मारत पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. राहुलने २१४ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ८४ धावांची, तर जाडेजाने ८६ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद २५ धावा केल्या असून अजूनही ते ७० धावांनी पिछाडीवर आहेत.
भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा खेळ १८३ धावांवर गडगडल्यानंतर दुसऱ्या दिवसाला लोकेश राहुल फॉर्मात असताना पावसानं खोडा घातला अन् खेळ थांबवावा लागला. तिसऱ्या दिवशीही टीम इंडियानं ९५ धावांची आघाडी घेत इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली अन् खेळ थांबवावा लागला.
भारताची दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १२५ अशी धावसंख्या होती. तिसऱ्या दिवशी पुढे खेळताना रिषभ पंतने आक्रमक शैलीत खेळ केला. त्याने २० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २५ धावांची खेळी केल्यावर त्याला ऑली रॉबिन्सनने बाद केले. राहुलने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याला जाडेजाची उत्तम साथ लाभली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. राहुलला शतक करता आले नाही. त्याला ८४ धावांवर जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद केले.
अँडरसननेच शार्दूल ठाकूरला खातेही उघडू दिले नाही. जाडेजाने मात्र एका बाजूने उत्तम फलंदाजी करत ८१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अखेर त्याला ५६ धावांवर रॉबिन्सनने बाद केले. यानंतर जसप्रीत बुमराह (२८), मोहम्मद शमी (१३) आणि मोहम्मद सिराज (नाबाद ७) या तळाच्या तीन फलंदाजांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने पहिल्या डावात २७८ धावांची मजल मारली. ऑली रॉबिन्सननं ( ५/८५) पाच आणि जेम्स अँडरसननं ( ४/५४) चार विकेट्स घेतल्या.




