राजकारण

मराठा आरक्षणावर आता मूक नव्हे ‘बोलका’ मोर्चा; विनायक मेटेंचा इशारा

पुणे: भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याच प्रश्नावर मूक नव्हे तर बोलका मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला. मराठा आरक्षण रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. त्यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल. तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला.

खासदार संभाजी छत्रपती चांगलं काम करत आहेत. पण त्यांनी अजूनही भूमिका घेतलेली नाही. येत्या २७ मे रोजी ते भूमिका घेणार आहेत. असं असलं तरी ते चांगलं काम करत आहेत. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्यावर अधिक बोलता येईल, असं ते म्हणाले.

सारथी संस्थेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पीएचडी करणाऱ्या २३९ विद्यार्थांची नोंदणी झाली आहे. पण गेल्या एक वर्षापासून त्यांना फेलोशीप मिळालेली नाही. विद्यार्थी संकटात आहेत. केंद्र सरकारने एम.फील बंद केलं आहे. पण आधीच जे एम. फील करत होते त्यांना आता पीएचडी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करतानाच १ जूनला विद्यार्थांना फेलोशीप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बार्टीच्या धर्तीवर सारथीलाही मदत मिळाली पाहिजे. सारथीत सध्या ५-६ कर्मचारी आहेत. १३९ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी भरती होणार आहे. तसेच सारथी संस्थेला स्वत:ची जागा मिळवण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शिवाय पवारांनी ४१ कर्मचारी-अधिकारी भरण्यास परवानगी दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

वडेट्टीवारांवर टीका

त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. विजय वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता होण्याची घाई झाली आहे. त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत नाही, अशी टीका मेटे यांनी केली. काँग्रेसमध्ये ओबीसी नेता होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वडेट्टीवार मोठे की नाना पटोले मोठे यावरून काँग्रेसमध्ये वाद आहे, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button