राजकारण

भाजप नेते शिरीष चौधरी यांच्याकडून २० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांचा थेट आरोप

मुंबई: कोणताही परवाना नसताना भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी २० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करून काळाबाजार केल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपाचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक चौधरी यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता, असा आरोप मलिक यांनी केला आहे. या प्रकरणी आमदार अनिल पाटील यांनी तक्रार नोंदवली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शिरीष चौधरी या भाजप नेत्याने स्वतः फोटोद्वारे हे जाहीर केले आहे. ओन्ली फॉर एक्स्पोर्ट असे औषधावर लिहिलेले असताना देखील ८ एप्रिल रोजी चौधरी बांधवाकडून रांगा लावून रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही असे सांगून १२ एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले. जवळपास ७०० – ८०० इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. परंतु आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवल्या होत्या. त्यापैकी ७०० – ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. आमदार राहिलेला एखादा नेता बेकायदेशीरपणे २० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ठेवतो, विकतो आणि वाटप करतो. हाच नेता नंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवण्यासाठी भेटला होता. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button