उत्तर प्रदेश विधानसभेसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी; अमित शाहांकडे मोठी जबाबदारी

कानपूर: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बीएल संतोष, धर्मेंद्र प्रधान, सुनील बन्सल, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, यूपीचे प्रभारी राधामोहन सिंह आणि कर्मवीर सिंह उपस्थित होते. यूपी निवडणुकीतील प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनाबाबत बैठकीत रणनीती ठरविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह स्वतः ब्रज आणि पश्चिम प्रदेशाचे प्रभारी असतील आणि प्रदेशांच्या बूथ अध्यक्षांच्या बैठका घेतील. या सभांच्या माध्यमातून हे बडे नेते प्रत्येक बूथ अध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत निवडणूक रणनीती आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. बूथ अध्यक्षांच्या बैठकांसाठी क्षेत्रनिहाय प्रभारी नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः गोरखपूर आणि कानपूर विभागाच्या बूथ अध्यक्षांच्या बैठकीची जबाबदारी घेतली आहे. तर, काशी आणि अवध प्रदेशातील बूथ अध्यक्षांचे नेतृत्व राजनाथ सिंह करणार आहेत.
भाजपचे यूपीवर विशेष लक्ष आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर जाणार आहेत. जेपी नड्डा २२ आणि २३ नोव्हेंबरला यूपीला भेट देणार आहेत. तेथे ते कार्यकर्त्यांची भेटी घेतील. २२ नोव्हेंबरला ते गोरखपूरमध्ये बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला संबोधित करतील. २३ नोव्हेंबरला कानपूरमध्ये बूथ अध्यक्षांची परिषद होणार आहे. नड्डा २२ नोव्हेंबरच्या रात्री लखनऊमध्ये मुक्काम करतील.