Top Newsराजकारण

बेळगाव महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता

महाराष्ट्र एकीकरण समितीचा सपाटून पराभव; फक्त ४ शिलेदार विजयी

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं ३५, काँग्रेसनं १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एमआयएम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे ३६ सदस्य होते.

५८ जागेवर निवडणूक असली तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे २ खासदार, २ आमदार आहेत. तर काँग्रेसचे २ आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी ३३ या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपनं ३५ जागा जिंकत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती, मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचा समावेश होता. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवल्या गेल्या. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले होते.

पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी

बेळगाव महापालिका निवडणुकीतील पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी लागणारा आहे. बेळगाव महानगरपालिका ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ताब्यातून गेली असून आता या महापालिकेवर भाजपची सत्ता असणार आहे. असे का झाले? एवढी वर्षे ताब्यात असलेली महापालिका कशी गेली? अंतर्गत वाद की आणखी काही, याची कारणे आता शोधावी लागणार आहेत.

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षानंतर झाली. यापूर्वी २०१३ साठी निवडणूक झाली होती. मात्र, २०१८ ला मुदत संपल्यानंतर चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे याबाबतचा वाद न्यायालयात होता आणि हा वाद सुरू असतानाच घाईघाईने कर्नाटक राज्य सरकारने ही निवडणूक जाहीर केली. बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते पण हेच निर्विवाद वर्चस्व भाजपने उलथवून टाकले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती मधील अंतर्गत मतभेद, इच्छुक वाढल्याने मूळ मराठी मतांत मोठ्याप्रमाणात विभागणी, प्रभागांची पुनर्रचना झाल्यामुळे मराठी उमेदवारांना फटका, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब, समितीचे ५८ पैकी फक्त २१ जागांवर अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र एकीकरण समितीला महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दर्शवला आहे. पण यावेळी या निवडणुकीसाठी महाराष्ट्रकडून पुरवली जाणारी रसद कमी पडली, अशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाची करणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांनी एकीकरण समितीमधील नेत्यांमध्ये जर एकसंधपणा आणायचा प्रयत्न केला असता तर हा पराभव टाळता आला असता. ज्येष्ठ नेते प्रा. एन डी पाटील आजारी असल्याने सर्व नेत्यांना एकत्र करण्यात समितीला अपयश आले.

एकीकरण समितीचे चार शिलेदार

बेळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या लाटेमध्ये एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवत महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा भगवा फडकवत ठेवला आहे. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले. वैशाली भातकांडे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून विजय मिळवला. तर शिवाजी मांडोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून वियज मिळवला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रवी साळुंके यांनी प्रभाग क्रमांक २७ मधून विजय मिळवला. तर बसवराज मोदगेकर यांनी प्रभाग क्रमांक ४८ मधून विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button