बेळगावात भाजपचं कमळ फुललं, मंगला अंगडी यांचा विजय
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी २९०३ मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक खूपच अटीतटीची झाली.
या निवडणुकीत अगदी शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. ३५०० मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर २९०३ मतांनी विजय मिळवला. त्यामुळे आता बेळगाववर भाजपचा झेंडा फडकला आहे.
बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण १० उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी, काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.