
लखनऊ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा यादवांना यादव कुटुंबापासून फोडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपत प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची अपर्णा यांची इच्छा होती, गेल्या काही काळापासून त्या या मतदारसंघात राबतही होत्या, मात्र, जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा भाजपने आपल्या मंत्र्यालाच उमेदवारी देऊन टाकली आहे.
योगी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेले बृजेश पाठक यांना भाजपने लखनऊ कैंटमधून उतरविले आहे. ते गेल्यावेळी लखनऊ मध्येच आमदार होते. अशा प्रकारे भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. प्रयागराजच्या भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला देखील उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळ मयंक जोशी हे समाजवादी पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. रिटा या दोनदा या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या आहेत.
अपर्णा यादव या लखनऊ कैंटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. २०१७ च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजपच्या दोन्ही नेत्यांची मागणी फेटाळण्यात आली.
लखनौ कैंट विधानसभा मतदारसंघातून २०१७ च्या निवडणुकीl भाजपने काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभेवर निवडून आल्यानंतर रिटा बहुगुणा जोशी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २०१९ मध्ये पोटनिवडणूक झाली ज्यात भाजपचे सुरेशचंद्र तिवारी विजयी झाले.
‘ईडी’च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपची उमेदवारी !
भाजपने लखनौसाठी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, ईडीमधील माजी अधिकाऱ्याला तिकीट दिलं आहे. ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सोमवारीच सिंह यांची स्वेच्छानिवृत्ती केंद्र सरकारने स्विकारल्याचं ट्विट त्यांनी स्वत: केलं होतं. सन २००७ मध्ये ते अंमलबजावणी संचानालय म्हणजे ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात १० पोलीस खात्यात काम केलं असून १४ वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.