‘अपना बूथ कोरोना मुक्त’ – कोरोनाला रोखण्यासाठी भाजपाची मोहीम
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही कमालीचे वाढत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपने एक मोहीम हाती घेतली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना ‘अपना बूथ कोरोना मुक्त’ अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांच्या पक्ष प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी विविध राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना लोकांच्या मदतीसाठी सहाय्यता डेस्क आणि हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. तसंच भाजपच्या सदस्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करावं. प्लाझ्मा दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय राखला जावा, अशा सूचनाही नड्डा यांनी विविध राज्यातील भाजपच्या प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवले जावे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असंही नड्डा यांनी म्हटलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाजप सदस्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आदेश नड्डा यांनी दिले आहेत.