मोदी विरुद्ध योगी चित्र उभे करण्यामागे भाजपचा मोठा प्लॅन; नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले की, कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशानं आणि जगानं पाहिलं. यामुळे योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले. उत्तर प्रदेशातील हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे असा टोला नवाब मलिकांनी भाजपाला लगावला आहे.
योगी आदित्यनाथ गुरुवारी सायंकाळी चार वाजता गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याशिवाय, काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटत आहेत.