मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी स्वबळाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांना चिमटे काढतानाच भाजपवरही निशाणा साधला. भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. ज्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी ५५ वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचा आज ५५ वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच शिवसेनेची पुढील वाटचाल आणि भाजपबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, २३ जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे १९ जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि १३ ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजेत, असंही ते म्हणाले.
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसला सुनावलं
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. त्यावरून शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. स्वबळाविषयी मी का सांगतोय तर जे अनेक जण सध्या स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचंय मला की स्वबळ म्हणजे फक्त निवडणूक लढण्यापुरतंच असायला हवं असं नाही. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकलं तर आनंद आहे. पण हारल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवंय. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. जर आत्मविश्वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाही आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठिवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेनं दिलं. सेनेची स्थापना झाली, तेव्हा मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. मराठी माणसाला अपमानित बनून जगावं लागत होतं. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आज महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी अवहेलना झाली असती ती विचारता सोय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला टोला
कोरोनाच्या काळातही शिवसेना पुढे सरसावली आहे. आपल्या महाराष्ट्रात तशा निवडणुका नाहीत. बंगालच्या ज्या निवडणुका झाल्या. स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसतं जिंकणं नाही. ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या आणि जिंकल्या. मला त्यांच्यासोबत बंगाली जनतेचं कौतुक करायचं आहे. याला म्हणतात स्वबळ. त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली. निवडणुका होतात, निवडणुका जातात. कोण हरलं कोण जिंकलं. हा विषय गौण आहे. ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप, हल्ले झाले. अंगावर झेलून सुद्धा बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणाने मांडलं. त्याला म्हणतात खरं बळ. ज्या बंगालने स्वातंत्र्यांच्या वंदे मातरमचा मंत्र दिला होता. त्याच बंगालचे दाखवून दिलं, पश्चिम बंगाल निवडणूक निकालावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना भाजपाला टोला हाणला.
गेल्या निवडणुकीत दुर्दैवाने जे पराभूत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना सांगितलं आपल्या समोरचा पराभूत हा शब्द काढा. पराभव हा निवडणुकीत झाला आहे. आपण मनाने खचलो नाही आहोत. मनाने खचला तो संपला. ते जे बळ आहे ते स्वबळ आहे. गेल्या ५५ वर्षात अनेक संकटं आली. आज सुद्धा संकटाचा सामना करतो. संकटाला मी घाबरलो तर मी शि्वसैनिक कसा? संकटाला मी घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब मला माफ करणार नाहीत. संकटाच्या छाताडावर चालून जा. संकटावर चालून जायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे आणि स्वबळ पाहिजे. काही जण उद्य़ा बातमी करतील. उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा, नारा नाही हा आमचा हक्क आहे. आमचा अधिकार आहे. तो केवळ निवडणुकांशी संबंधित नाही. तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी आहे. कोणाविरुद्ध अन्याय? स्वत:विरुद्ध अन्याय अजिबात नाही, असा प्रश्न त्यांनी शिवसैनिकांना विचारला.
शिवसेना जेव्हा नव्हती तेव्हा कार्यालयातील खिडक्या, दरवाजे मराठी माणसांसाठी बंद होत्या. त्या बंद दरवाज्यावर धडक मारून, तोडून कार्यालयात मराठी माणसं घुसवली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. हे शिवसेनेचं कर्तृत्व मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिली. त्यानंतर मराठी माणूस पेटून उठला. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखाच्या लक्षात हिंदुत्वावर संकट आलं आहे. तेव्हा त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा दिला. शिवसेनेने मराठी आणि हिंदुंना आधार दिला. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे.आपण मराठी आहेत. कोण गुजराती आहे. आणखी कोण आहे. देशाचा पाया हा प्रादेशिक आस्मितेचा आहे. प्रादेशिक आस्मितेवर जर घाला आला. तर तडाखे बसल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.