राष्ट्रवादीबाबत भाजप श्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य : चंद्रकांत पाटील
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र, भेट झाली की नाही याबाबत मला काही माहित नाही. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत मी काही सांगू नाही शकत. चर्चा तर होतच आहेत. परंतु, सध्याची तशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे श्रेष्ठी निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे ठरेल तेव्हा कळेल, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र, या वाढत्या आकडेवारीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. आता जर लॉकडाऊन केला तर तुम्ही एक रुपयाचे पॅकेज देणार नाही. एक वर्ष लोक कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी पूर्वी जसा राजा कपडे बदलून वस्त्या वस्त्या फिरायचा तसे फिरावे लागेल. कारण तुम्ही मुख्यमंत्री असल्यामुळे तुमच्यासोबत ताफा असणार. त्यामुळे तुमच्याशी कोणीही मनमोकळेपणाने बोलणार नाही. तुम्ही झोपड्यांमध्ये जा. त्याठिकाणी फिरा. तेथील अनेक नागरिक काहीतरी दिवसभर काम करुन मग घरी परतल्यानंतर जेवतात. तर त्यांना तुम्ही काहीही दिल नाही. त्यात नुकतेच दोन महिने चांगले गेले आणि आता तुम्ही लॉकडाऊन करता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना कोणतीही लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचेही आता रांगेने चाचणी करावी. आता चाचणीची किंमत २०० आणि २५० रुपये आहे. लोक चाचण्या करतील. लवकरात लवकर रिपोर्ट द्या आणि तात्काळ उपचार करा. उपचाराची केंद्र वाढवा. मात्र, यावर लॉकडाऊन हा काही पर्याय योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे काळजी घेऊन नित्याचे व्यवहार सुरु ठेवावे. नाईट कर्फ्यू मान्य आहे. कारण कोणाला ना रात्रीचे बाहेर पडायचे असते. ज्यांना बाहेर पडायचे असते, ते तुमच्यासोबतच आहेत. ज्यांना नाईट लाईफ हवे असते. त्यामुळे सामान्य नागरिकांना नाईट लाईफ नको आहे. कारण त्यांना सातच्या आत घरात जायचे असते. त्यामुळे तुम्ही ७ करा ८ करा किंवा ९ करा. यामुळे कोणाला फरक पडत नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.