![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/05/sambhajiraje-chandrant-patil-modi.jpg)
मुंबई: भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी खासदार संभाजी छत्रपती यांच्याविरोधात गेल्या २४ तासात वक्तव्य केलेली आहेत. त्यावरुन भाजपनं स्वत:च राज्यसभेवर पाठवलेल्या खासदाराविरोधात आघाडी उघडल्याची चर्चा आहे. कारण आहे खासदार संभाजी छत्रपती यांनी गेल्या काही काळात मराठा आरक्षणावर घेतलेली भूमिका.
खा. संभाजीराजे छत्रपती यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारून त्यांचा अपमान केल्याची टीका गेल्या काही काळापासून आघाडीचे नेते करत आहेत. त्यात काही मराठा नेत्यांचीही तशी भावना आहे. त्यावर खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं तर संभाजीराजे हे पक्षानं म्हणजेच भाजपानं केलेला सन्मान सांगत नसल्याचं वक्तव्य केलं. एवढंच नाही तर अहमदाबादमध्ये संभाजीराजेंच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदी कसे उभे ठाकले याची आठवणही करून दिली. संभाजीराजे छत्रपतींच्याविरोधात वक्तव्य करणार नाही असं म्हणत असतानाच पाटलांनी खरं तर विरोधी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट घेतली. ही धावती भेट असल्यासारखी होती. शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले, अवघ्या दहा मिनिटाच्या भेटीत मराठा आरक्षणाची कशी काय चर्चा पूर्ण होऊ शकते? संभाजीराजे छत्रपतींच्या याच भेटीवरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही टीका केली. शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? असं वक्तव्य राणेंनी केलं आहे. संभाजी छत्रपतींनी मोदी सरकारविरोधातच वक्तव्य केल्यानंतर राणेंनी त्यावरही टीका केली. ज्यांनी खासदार केलं त्याच्याविरोधात असं वक्तव्य योग्य नसल्याचं राणे म्हणाले. राणेंची ही टीका कमी होती म्हणून की काय, आज निलेश राणेंनी राजेंना मराठा आरक्षणाच्या ‘ठेक्या’चीच आठवण करून दिली. निलेश राणे ट्विट करत म्हणतात, संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतंय. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.
मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर खा. संभाजीराजे छत्रपती आणि भाजपा यांची भूमिका वेगवेगळी दिसते. संभाजीराजे छत्रपतींना भाजपानं खासदार केलं असल्यामुळे ते भाजपचीच भूमिका रेटतील अशी चर्चा होती. पण, त्यांनी मोदींनी त्यांना नाकारलेली भेट, त्यावरची त्यांची नाराजी, खासदारकी सोडण्याची त्यांची भाषा, त्यांनी सुरू केलेल्या राजकीय भेटीगाठी, प्रसंगी भाजपविरोधातच काही वक्तव्य. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि भाजपात दरी वाढत असून भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडल्याचे दिसून येत आहे.