Top Newsराजकारण

भाजपला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं : चंद्रशेखर राव

हैदराबाद : भारताचे संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहे. त्यासाठी, सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी म्हटले. यावेळी, राव यांनी भाजपवर हल्लाबोलही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार नेते आणि पक्षापासून मुक्त करायला हवं. आपण, लवकरच उद्धव ठाकरेंना भेटायला मुंबईला जाणार… असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रातील भाजपविरुद्ध विरोधक एकटवत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता इतर राज्यांनीही मोदी सरकारविरुद्ध वज्रमुठ आवळायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता तेलंगणाचेमुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही म्हटले आहे.

भाजपकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. समाजात फूट पाडण्याचं आणि खोटा प्रचार, खोटा प्रसार करण्याचं कामही भाजपकडून होत असल्याचे केसीआर यांनी म्हटले. राव यांनी मोदी सरकारच्या २०२२ च्या अर्थसंकल्पावरही टीका केली. हे बजेट बेकार आणि उद्देशहीन असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका आणि उद्धव ठाकरेंना भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा पाहता, भाजपचे अच्छे दिन धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button