पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. सर्वच पक्षांचे नेते अत्यंत चुकीच्या पद्धतीने एकमेकांवर बिनबुडाच्या टीकाही करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. भाजपा-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली असून त्यातून मार्ग काढला पाहिजे. असं त्यांनी सांगितलं आहे.
रामदास आठवले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आले होते. आठवले म्हणाले, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटावा यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजप -शिवसेना एकत्र येऊन दोन्ही पक्षांनी राज्याचा विकास साधला पाहिजे.
महाराष्ट्रात माजी खासदार किरीट सोमय्या व खासदार संजय राऊत यांच्यात सध्या आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. माजी खासदार सोमय्या यांच्याविषयी बोलताना खासदार राऊत अत्यंत चुकीची भाषा वापरली. खासदार राऊत यांच्या भाषेवरून आक्षेप घेतले जात असताना यावर केंद्रीय मंत्री आठवले यांनी भूमिका मांडली आहे. टीका करताना खासदार संजय राऊत यांनी योग्य भाषा वापरावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
उत्तर प्रदेशासह देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत. या पाचही राज्यात भाजपाबरोबर आम्ही आहोत. या सर्व ठिकाणी भाजपा सत्तेत येणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत लढणार आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान २५ जागा मिळाव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे. तर आम्ही महापालिका एकत्र लढू आणि जिंकून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.