
नाशिक/सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत असताना नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्य संपर्क कार्यालयावर दगडफेक करुन तोडफोड केली आहे. दरम्यान, सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असताना नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नव्हता. युवासेनेचे चार कार्यकर्ते एका कारमधून कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात भाजप कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यानंतर दगडफेक करणाऱ्यांनी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी करत माफी मागा नाहीतर परिणाम आणखी वाईट होतील असा इशारा देखील त्यांनी दिला.
जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.
राज्यात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून राणेंविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईतील जुहू येथे राणेंच्या निवासस्थानाबाहेर देखील तणावाचं वातावरण आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले असून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत.