मराठा मंत्र्यांना आरक्षणापेक्षा मंत्रीपद टिकविण्यात रस; खा. नारायण राणेंचा हल्लाबोल
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्या प्रश्नावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही सुरुच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यावरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपलं मंत्रिपद टिकवण्यात रस आहे. महाविकास आघाडीकडून जबाबदारी झटकण्याचं काम सुरु आहे. ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं, अशा शब्दात राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केलाय.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या पावलांबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असंही राणेंनी म्हटलंय. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठ्यांना आरक्षण देणं हे या सरकारच्या मनात नाही. त्यामुळे मराठ्यांनी आता एक होण्याची गरज आहे. सगळ्या मराठा संघटनांनी एक व्हायला हवं. समाजानेही एकत्र यायला हवं, असं आवाहन राणे यांनी केलंय.