मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केल्यानं विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर तो महाराष्ट्राचा अपमान होतो मग देशाच्या पंतप्रधानांबाबत अशाप्रकारे नक्कल करत टीका करणं देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांवर तोंडसुख घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. कुठल्याही नेत्याची बदनामी या सभागृहात होता कामा नये. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी आम्ही माफी मागायला सांगावी असं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहात भाजप आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यावर भास्कर जाधव यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली.
भास्कर जाधव म्हणाले की, मी मोदींची आताची नाही, तर ते पंतप्रधान होण्यापूर्वीची नक्कल केली. मी ते पंतप्रधान असल्याच्या आधीचं बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच मी असंसदीय शब्द वापरला नाही. तरीही सभागृहाच्या भावना दुखवल्या असतील, तर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी केवळ दिलगिरी व्यक्त करत नसून सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटले.
गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले होते. त्याची सल भाजपाच्या मनात अजूनही आहे. माझ्याविरुद्ध त्यांना काहीच कारण मिळत नव्हते. त्यामुळे आज माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी पंतप्रधानांचा अपमान केला, असे वातावरण निर्माण करण्यात आले आणि मला माफी मागायला लावण्यात आली, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी कान टोचताच जाधवांची ‘बिनशर्त माफी’
अखेर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान टोचताच, भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. जाधव-फडणवीस आमने सामने आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात छोटेखानी भाषण केलं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, कुठल्याही सन्माननीय व्यक्तीचा अवमान होईल, असे कृत्य कोणीही करू, नये, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात कान टोचले. त्यानंतर, विरोधी पक्षनेते आणि विरोधकांकडून मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देत बिनशर्त माफी मागितली.
ऊर्जा विभागाच्या लक्षवेधीवेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०-५० लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचं विधान केल्याचा संदर्भ देत भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावेळी, मध्येच मी हक्कभंग आणणारच आहे, मी हक्कभंग आणणारच आहे. भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर, भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली.
ऊर्जामंत्र्यांच्या विधानावर फडणवीसांचा संताप
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ताधारी आणि मंत्र्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. सर्वप्रथम शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी प्रहार केला. त्यानंतर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला. राज्यातील नागरिकांना १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री राऊत यांनी केली होती. मात्र, कोविडमुळे ते शक्य न झाल्याचं राऊत यांनी विधानसभेत सांगितलं.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात ५०-५० लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. हे चालू देणार नाही… हे चालणार नाही अध्यक्षमहोदय… देशाचे पंतप्रधान आहेत ते… त्यांनी कधीही अशी घोषणा केली नाही. ऊर्जामंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीच फडणवीस यांनी केली.
सन्माननीय नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकींवेळी मोदींनी घोषणा केली होती. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा मी परत आणेन आणि देशातील नागरिकांना १५-१५ लाख रुपये देईन, असे म्हटले होते, हे जर खोटं असेल तर तपासून घ्यावेत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत म्हटलं. त्यावर, फडणवीस यांनी हेही विधान खोटं असून मोदींनी कधीही तसं म्हटलं नसल्याचं सांगितलं. आही हे सहन करणार नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला.