राजकारण

भाजपला धक्का; सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ !

मुंबई: भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. १९९९ पर्यंत काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं वर्चस्व होतं. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण ते आम्हाला तिकीटच मिळू द्यायचे नाहीत. १९९९ काँग्रेमधून राष्ट्रवादी वेगळा झाला आणि एका झटक्यात मी, अनिस अहमद, नाना पटोले आणि नितीन राऊत निवडून आलो, असा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे देशमुख यांच्यासह विदर्भातील नेत्यांचं तिकीट कापणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते नेते कोण? असा सवाल केला जात आहे.

यावेळी त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून ते मंत्री होण्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसने आम्हाला वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षीच तिकीट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने आम्हाला वयाच्या 25व्या वर्षी तिकीट दिलं. पण राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. कोण कधी वर जातो तर कधी खाली येत असतो. काँग्रेस वाढवली. सहकार क्षेत्रात काँग्रेसची ताकद निर्माण केली. तरीही मला २००९ मध्ये तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे मला धक्काच बसला. पण मला समजावण्यासाठी अविनाश पांडे हेलिकॉप्टरने घरी आले होते. अहमद पटेलांशी त्यांनी बोलणं करून दिलं होतं. त्यावेळी मला चार पाच महिने आधी सांगितलं असतं तर मी मानसिकता तयार केली असती. आता अवघ्या काही दिवासांवर निवडणूक आहे, असं मी त्यांनी सांगितलं. त्यानंतर निवडणुकीला अपक्ष म्हणून उभा राहिलो. केवळ अडीच हजार मतांनी पडलो. त्यानंतरही मी कोणत्याच पक्षात गेलो नाही. उलट नवा पक्ष काढला. तसेच दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नही केले. पण कोणी तरी बूच मारलं होतं. त्यामुळे त्यात यश आलं नाही, असं ते म्हणाले.

मी पराभूत झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला पहिला फोन केला. त्यांनी मला भेटायला बोलावलं. त्यावेळी त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. पत्रकारांनी काँग्रेसमधून काढल्याबद्दल डिवचल्यास काँग्रेस मुझे पार्टी से निकाल सकती है, मगर मेरे खून में से काँग्रेस को नही निकाल सकती, असं पत्रकारांना सांगत जा, असा सल्ला मला विलासरावांनी दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतचाही किस्सा सांगितला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मला नेहमीच भेट दिली. जेव्हा वेळ मागितली तेव्हा भेट दिली. आमदारांना त्यांची वेळ मिळत नसायची, पण मला ते वेळ द्यायचे. मी आमदारही नव्हतो आणि कोणत्याही पक्षात नव्हतो, तरीही ते मला वेळ द्यायचे. त्याबद्दल त्यांना विचारलं असता आमदार कधीही तयार करता येतो. पण नेता लवकर तयार होत नाही. त्यासाठी ३०-३० वर्षे जातात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा देशमुख प्रचंड भावूक झाले होते.

२०१४ मध्ये काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी मी पुन्हा प्रयत्न केला. हायकमांडला भेटलो. अहमद पटेल यांनी कामाला लागा म्हणून सांगितलं. पण पुन्हा तिकीट कापलं गेलं. त्यानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध होते. त्यामुळे त्यांनी मला पक्षात घेतलं. तिथे मी निवडूनही आलो. पण मी तिथे रमलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

सहा-आठ महिन्यापूर्वी मला अहमदभाईंचा फोन आला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगितलं. मीही त्यांचा आदेश मानण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे माझा प्रवेश काही झाला नाही. त्यानंतर नाना भाऊंनी पुढाकार घेतला. त्यांनी अमरावतीत आल्यावर मला एकत्र काम करण्याची ऑफर दिली आणि त्यानंतर आज प्रवेश होत आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button