Top Newsराजकारण

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी लेकीसोबत घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील लेकीसह गेले होते. कन्या अंकित पाटील यांच्या विवाहाची पत्रिका हर्षवर्धन पाटलांनी राज ठाकरे यांना दिली. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

२०१४ च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button