संजय राऊतांबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांनी फटकारले
परभणी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विभ्याचा लाभ मिळत नाहीये, असं ते म्हणाले.
फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असंही टोलाही त्यांनी लगावला.