महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणे बंद करावे !
भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
रायपूर: पेट्रोलच्या दरानं शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल देखील नवद्द रुपयांच्यावर गेलं आहे. खाद्यतेलांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. महागाई आणि कोरोनाचं संकट वाढलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्तीसगडमध्ये तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या वरिष्ठ भाजप नेत्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्रीजमोहन अग्रवाल या भाजप नेत्यानं, जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.
छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या काळात तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजप आमदार ब्रीजमोहन अग्रवाल यांनी महागाईवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल, असं ते म्हणाले. अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी अग्रवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. मोहन मरकाम यांनी महागाई ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं. गेल्या ७ वर्षात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महागाईमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं लोकांचं उत्पन्न घटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळं लोकांसमोरील अडचणी वाढल्या असताना महागाई देखील वाढली आहे. भारतातील वाढत्या महागाईला मोहन मरकाम यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची धोरण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.