भाजपकडून हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी; उत्तर प्रदेश निवडणुकीत फायदा घेण्यासाठी राजकारण : पटोले

कल्याण : अमरावतीत जो काही प्रकार घडला, त्यात भाजपचे माजी मंत्री आणि २५-२६ कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले. त्यामुळे भाजप राज्यात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करत असून उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र शांत झाला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
बदलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली. भाजप राज्यात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करत असून उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र शांत झाला, असं नाना पटोले म्हणाले.
पटोले यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरूनही भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजप आहे, हे आता उघड झालं आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जातंय. राज्य सरकार एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. एसटी कामगारांना न्याय नक्की मिळेल, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. कारण संपामुळे त्यांचं नुकसान होईल, असं आवाहन पटोले यांनी केलं.