नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, शिवसेना भाजपला पहिला धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आज नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यामुळे, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. यामुळे ते भाजपत नाराज असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. खरेतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा भाजपत प्रवेश केल्यापासूनच नाशिकमध्ये सेना-भाजप राजकारण पेटल्याचे दिसत आहे. सानप यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपत गेले आहेत.
बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर, शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत. यानंतर भाजप नेते सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता प्रथमेश गितेही त्याच वाटेवर दिसत आहेत. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र आहे.