राजकारण

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडित यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

या हल्ल्यात शेजाऱ्यांची मुलगीही जखमी झाली आहे. मृत भाजप नेते राकेश पंडित जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते. पक्षात तरुणांना सामील करुन घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते राकेश पंडित हे मुलगा ब्रज नाथसोबत काही कामाच्या निमित्ताने शेजारी राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

दहशतवादी घरात घुसले आणि राकेश पंडित यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आसिफा मुश्ताक या तरुणीलाही गोळ्या लागली. आसिफा ही मुश्ताक अहमद यांची मुलगी आहे. दोघांना गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान राकेश पंडित यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक सैन्यासह घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण परिसराला वेढा दिला. शोधमोहीम सुरु करण्यात आली परंतु हल्लेखोर दहशतवाद्यांचा कोणताही पुरावा सापडला नाही. राकेश पंडित हे या परिसरातील भाजपचे मोठे नेते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button