खुर्शीदांविरोधात भाजप आक्रमक; पोलिसात तक्रार

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’, असं या पुस्तकाचं नाव असून त्यामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकातील संदंर्भावर भाजपाकडून टीका होत आहे. त्यातच आज भाजप आमदार राम कदम, खुर्शिद यांच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली आहे.
हिंदुत्व आणि इसिसमध्ये फरक काय ? हे समजून घेण्यासाठी त्यांना पाकिस्तानमध्ये जायचे असल्यास त्यानी खुशाल जावे. हिंदुत्वाचा अपमान करणार्या भारताच्या पवित्र भूमित खुर्शीद यांची आवश्यकता तरी काय ? असा सवाल भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
अशी तुलना वास्तवात चुकीची : गुलाम नबी आझाद
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे. हिंदुत्वाची तुलना इसिसशी केली जाऊ शकते, हे चुकीचे आहे आणि अतिशयोक्ती आहे, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. आझाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत एक ट्विट केलं आहे. हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी इसिस आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे, असं म्हटलं आहे.
या प्रकरणात विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सलमान खुर्शीद यांनी केला आहे. त्याचसोबत भाजपाने या पुस्तकावरुन सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ही भूमिका केवळ सलमान खुर्शीद यांचीच नव्हे तर काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. देशात बहुसंख्याक असलेल्या समाजाच्या भावना दुखावण्यासाठीच हे विधान केलं असावं हे यातून स्पष्ट होते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुनच हे वारंवार केले जाते असा आरोप भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.