Top Newsराजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट

मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने ४६ जागा जिंकल्या. तर भाजपने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८५; तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४४ रिक्तपदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तथापि, भाजपच्या जागा मात्र घटल्याचे निकालावरून दिसते. नागपूर जि. प.मध्ये ओबीसींची १ जागा तर पंचायत समितीत १२ जागा कमी झाल्या आहेत. नंदुरबार जि. प.मध्ये ३ तर धुळे पंचायत समितीत ओबीसींची १ जागा कमी झाली.

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी स्वतंत्र लढूनही मिळविलेल्या जागांची बेरीज केल्यास भाजपहून दुप्पट जागा पटकावल्याचे दिसते. यामुळे ग्रामीण झुकते माप दिल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर पोटनिवडणुकीचे मंगळवारी मतदान होऊन बुधवारी मतमोजणी झाली. महाविकास आघाडीतील तीन पैकी दोन पक्ष एकत्र लढले किंवा तिघेही वेगवेगळे लढले, असे बहुतेक ठिकाणचे चित्र होते. अत्यंत अपवादात्मक ठिकाणीच तिघे एकत्र होते. धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या.

पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपले सदस्य संख्याबळ दोनने वाढवीत पाच गटात विजय संपादन केला, तर भाजपने आपले संख्याबळ चारवरून पाच केले आहे. सीपीएमने आपला उधवा गट शाबूत ठेवला असताना राष्ट्रवादी पक्षाला मात्र सातपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत १५ जागांसाठी ७४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० असे एकूण १४४ उमेदवार रिंगणात होते.

तलासरी तालुक्यातील उधवा गटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अक्षय दवणेकर (४,९९७) यांनी भाजपच्या नरहरी निकुंभ (४,३७५) यांचा पराभव केला आहे. डहाणू तालुक्यातील चार गटांपैकी बोर्डी गटात भाजपच्या ज्योती पाटील (५,२८३) यांनी राष्ट्रवादीच्या उन्नती राऊत (४,८६७) यांचा पराभव केला. कासा गटात राष्ट्रवादीच्या लतिका बालशी (५,३१२) यांनी शिवसेनेच्या सुनीता कामडी (२,७२५) यांचा पराभव केला. सरावली गटात भाजपच्या सुनील माच्छी (४,१११) यांनी सीपीएमच्या रडका कलंगडा (३,६१६) यांचा पराभव केला. वणई गटात भाजपच्या पंकज कोरे (३,६५४) यांनी काँग्रेसच्या वर्षा वायडा (३,२४२) यांचा पराभव केला. शिवसेना उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटात भाजपच्या संदीप पावडे (४,१५३) यांनी राष्ट्रवादीच्या विपुल पाटील (३,३५१) यांचा ८०२ मतांनी पराभव केला. मोखाडा तालुक्यातील आसे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष हबीब शेख (५,६७५) यांनी भाजपच्या शिवा निसाळ (४,०१४) यांचा पराभव केला. पोशेरा गटात शिवसेनेच्या सारिका निकम (४,३१३) यांनी भाजपच्या किशोरी गाटे (३,९८६) यांचा पराभव केला.

वाडा तालुक्यातील गारगाव गटात राष्ट्रवादीच्या रोहिणी शेलार (६,७५५) यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील (४,९१३) यांचा पराभव केला. मोज गटात सेनेच्या अरुण ठाकरे (५,४९५) यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद देशमुख (३,४३१) यांचा पराभव केला. मांडा गटात राष्ट्रवादीच्या अक्षता चौधरी (४,११४) यांनी भाजपच्या राजेंद्र कुमार पाटील (३,७६८) यांचा पराभव केला. पालसई गटात शिवसेनेच्या मिताली बागुल (५,३२९) यांनी भाजपच्या धनश्री चौधरी (४,०३८) यांचा पराभव केला. आबिटघर गटात राष्ट्रवादीच्या भक्ती वलटे (३,६७९) यांनी निसटत्या मताने भाजपच्या मेघना पाटील (३,६५८) यांच्यावर अवघ्या २१ मताने विजय मिळविला. पालघर तालुक्यातील सावरे-एम्बूर गटात शिवसेनेच्या विनया पाटील (६,५७६) यांनी बहुजन विकास आघाडीच्या प्रांजल पाटील (२,९४१) यांचा पराभव केला. नंडोरे-देवखोप या गटात मागच्या पराभवाचे उट्टे काढीत शिवसेनेच्या नीता पाटील (४,०७२) यांनी राष्ट्रवादीच्या कविता खटाळी (३,२०५) यांचा पराभव केला.

जिल्हावार आकडेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ पैकी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसच्या खात्यात प्रत्येकी १ तर राष्ट्रवादीच्या खात्यात दोन जागा गेल्या आहेत. तर ९ जागांवर वंचित आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये भाजपाने ४, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे जिल्ह्यातील १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने ८, राष्ट्रवादीने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील १६ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर भाजपने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरीत २ जागांवर इतरांनी बाजी मारली. वाशिममधील १४ पैकी राष्ट्रवादीने ५, काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी २, शिवसेनेने १ आणि इतरांनी ४ जागांवर कब्जा केला.

मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका : अशोक चव्हाणांचा निशाणा

मराठा आरक्षण व ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याबद्दल संबंधित जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण असो वा ओबीसींचे राजकीय आरक्षण, दरवेळी भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. केंद्रातील त्यांच्या सरकारला ही दोन्ही आरक्षणे कायम ठेवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्याची संधी असताना त्यांनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत. सार्वजनिकरित्या बोलताना ओबीसींचे तारणहार आम्हीच, मराठ्यांचे तारणहार आम्हीच, अशी भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ आल्यावर नामनिराळे राहण्याचे भाजपचे धोरण मतदारांच्या लक्षात आले असून, त्यांनी मतदानातून नाराजी व्यक्त केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा : नाना पटोले

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्वाचा असतो, आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करु शकलो.

काँग्रेस पक्षाने स्वंतत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भाजपाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो, संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल नाना पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button