
पणजी : पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अनेक नेते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने गोवा युनिटच्या नेत्यांचे स्वागत केले. उत्तर गोवा काँग्रेस सेवा दल प्रमुख उल्हास वासनकर त्यांच्या समर्थकांसह आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह तृणमूलमध्ये सामील झाले.
त्यांच्याशिवाय काँग्रेसच्या महिला शाखेच्या माजी सरचिटणीस प्रिया राठोडही तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेससह शिवसेनेचे नेतेही तृणमूलमध्ये सामली झाले आहेत. शिवसेनेचे ब्लॉक अध्यक्ष विनोद बोरकर त्यांच्या काही समर्थकांसह तृणमूलमध्ये सामील झाले. पणजीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री मानस राजन भुनिया आणि गोवा तृणमूल नेते मारिओ पिंटो आणि विजय पै उपस्थित होते.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तृणमूलमध्ये सामील
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो २९ सप्टेंबर रोजी कोलकात्यात आपल्या समर्थकांसह तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. आपल्या पक्ष प्रवेशादरम्यान फालेरो यांनी गोव्यातील लोकांसाठी ‘विभाजनवादी आणि फॅसिस्ट शक्तींविरुद्ध’ लढायची घोषणा केली होती. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केल्याबद्दल कौतुक केले होते.